logo

सहा महसूल मंडळातील ४५०१० शेतकऱ्यांच्या खात्यात रु.४१.६२ कोटी जमा करण्याची प्रक्रिया सुरू -आ राणाजगजितसिंह पाटील


धाराशिव (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील मोहा ता. कळंब, पाडोळी (आ) ता. धाराशिव, सलगरा (दि.) व सावरगाव ता. तुळजापूर तर अनाळा व सोनारी ता. परंडा या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप २०२२ मधील नुकसानीपोटी अनुज्ञेय भरपाईची विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून ४५०१० शेतकऱ्यांच्या खात्यात रु. ४१.६२ कोटी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

शासन मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप २०२२ मधील नुकसानी पोटी प्रत्यक्ष नुकसानीच्या ५० % च भरपाई वितरित केली होती. मात्र शासन व प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असलेल्या भारतीय कृषी विमा कंपनीने संपूर्ण भरपाई देण्याचे मान्य केले होते. मात्र शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा भरपाई ची रक्कम ११० % हून अधिकची असल्याने विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे बाकी होती. सदरील रक्कम प्राप्त होताच उर्वरित सहा मंडळातील रक्कम वितरित करण्याचे विमा कंपनीने मान्य केले होते. त्यामुळे ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते.

शासनाकडून अनुज्ञेय असलेली रक्कम कृषी आयुक्त यांच्या मार्फत विमा कंपनीला वर्ग करण्यात आल्यानंतर सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. जिल्ह्यातील ४५०१० शेतकऱ्यांच्या खात्यात रु. ४१.६२ कोटी जमा करण्यासाठी एनसीआयपी पोर्टल वर माहिती अपलोड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे सुरु असून पुढील दोन दिवसात नुकसान भरपाईची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

खरीप २०२२ प्रमाणेच २०२० व २०२१ मधील शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, तत्कालीन ठाकरे सरकारच्या दुर्लक्षामुळे यासाठी न्यायालयात दाद मागावी लागली आहे. मात्र तरीही न्यायालयीन लढाई च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळवून देवू अशी प्रतिक्रिया आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

92
4052 views